Bhool Bhulaiyaa 3 : कार्तिकने दिली मोठी अपडेट; ‘भूलभुलैया ३’ दिवाळीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला!

बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यन याचा ‘भूलभुलैया २’ हा चित्रपट चांगलाच गाजला होता. अशातच या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाचीदेखील घोषणा झाली असून प्रेक्षक आतुरतेने या चित्रपटाची वाट पाहात आहेत.

पुन्हा एकदा रुह बाबाच्या भूमिकेतून कार्तिक आर्यन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, तसेच कार्तिकसह या चित्रपटात तृप्ती डिमरीदेखील झळकणार आहे. दरम्यान, अलीकडेच कार्तिकने या चित्रपटाच्या टीझर आणि प्रदर्शनाबाबत मोठी अपडेट दिली आहे. लवकरच या चित्रपटाचा टीझर लॉन्च करण्यात येईल, असे त्याने सांगितले आहे.

चित्रपटाबद्दल बोलताना कार्तिक आर्यन म्हणाला की, भूल भुलैया ३ चित्रपट दिवाळीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने यासाठी मी खूप उत्साही आहे. नुकत्याच एका कार्यक्रमात अभिनेता कार्तिक आर्यनने ‘भूलभुलैया ३’ चित्रपटाबद्दल माहिती दिली आहे. कार्तिकने पुढे सांगितलं की, संपूर्ण टीमने हा चित्रपट पाहिला आहे आणि प्रत्येक जण याबद्दल खूप आनंदी आणि सकारात्मक आहे.

चित्रपटाला फायनल टच देण्याचं काम सुरू असून लवकरच ‘भूलभुलैया ३’ चा टीझर, ट्रेलर आणि गाणी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. काही दिवसांत तुम्हा सर्वांना चित्रपटाचा टीझर, ट्रेलर, गाणी आणि नंतर चित्रपट पाहायला मिळणार आहे. दरम्यान, हा चित्रपट दिवाळीला प्रदर्शित होणार आहे.