खानापुरात बाबर कुटुंबीयांकडून मुलींसाठी ‘मी दुर्गा’ उपक्रम सुरू

सध्या स्त्री अत्याचाराच्या मोठ्या प्रमाणात घटना घडू लागल्याने मुलींना स्वरक्षणासाठी दिवंगत शोभाकाकी बाबर फाउंडेशनने ‘भी दुर्गा’ उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाद्वारे खानापूर तालुक्यातील शाळांतील सर्व मुलींना लाठी-काठी व साहसी खेळांचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी दिली. सुहास बाबर म्हणाले, स्वसंरक्षण हा आजच्या घडीचा महत्त्वाचा भाग आहे. स्वतःचे संरक्षण स्वतः करण्याचे प्रशिक्षण दिले तर आपल्या भगिनींच्यात धाडस निर्माण होईल.

त्यांच्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याचे धाडस होणार नाही. त्यासाठी फाउंडेशनच्यावतीने खानापूर तालुक्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थिनींना मोफत लाठी-काठी व साहसी खेळांचे प्रशिक्षण ‘मी दुर्गा’ उपक्रमांतर्गत देण्याचा निर्णय घेतला आहे. हे प्रशिक्षण तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून देण्यात येणार आहे.