लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला प्रत्येक पक्षाची जोरदार तयारी सुरू झालेली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळावे, सभा यांचे आयोजन सुरू आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत इचलकरंजी मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाकडेच राहावा आणि एकनिष्ठ काँग्रेस कार्यकर्त्याला उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळी शहर काँग्रेसचे संघटन बळकट झाले असून नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना (उबाठा) चे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांची सर्व प्रचार यंत्रणा काँग्रेस कार्यालयातून चालवली.सरुडकर यांना ७१,००० मते मिळवून देण्याचे काम काँग्रेसच्या पुढाकाराने झाले आहे. या बाबींचा विचार करून इचलकरंजी विधानसभा मतदार संघ हा काँग्रेस पक्षाकडे राहील, असे प्रयत्न होणे आवश्यक आहे.
यावेळी शहराध्यक्ष संजय कांबळे, इचलकरंजी इंडस्ट्रियल इस्टेटचे चेअरमन राहुल खंजिरे, प्रदेश सचिव शशांक बावचकर, शशिकांत देसाई, बाबासो कोतवाल, मीना बेडगे, प्रमोद खुडे, युवराज शिंगाडे, रविराज पाटील, बिस्मिल्ला गैबान आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.