कागल तालुक्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दोन रुग्णालये मंजूर करून आणली आहेत. आमचा नर्सिंग कॉलेजचा प्रस्ताव असताना त्याकडे लक्ष दिले नाही. तुमचा मतदारसंघ म्हणजे जिल्हा नव्हे, अशा शब्दांत आमदार प्रकाश आवाडे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना ठणकावलं आहे.
पालकमंत्री तिकडे होते. कोविडमध्ये आम्ही त्रास भोगला. आता सगळे एकत्र असूनही उपयोग होत नाही. यापुढे हे चालणार नाही. आता पालकमंत्री आणि आम्ही हे सुरूच होणार आहे, असा इशाराही प्रकाश आवाडे यांनी मुश्रीफ यांना दिला आहे.
यानंतर माजी आमदार सुरेश हाळवणकर यांना उद्देशून प्रकाश आवाडे म्हणाले, तुम्ही कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन सांगितलं की, ज्यांना प्रवेश दिला नाही, त्यांना उमेदवारी दिली जाणार नाही. आम्ही म्हणतो, आम्ही प्रवेश केला नाही. मी पाच वर्षे भाजपसोबत राहिलो.
पण, मी आता लढणार नाही, राहुल लढणार आहे, असं भाजप नेत्यांना स्पष्टपणे सांगितलं आहे. त्याबाबत भाजप नेते निर्णय घेणार आहेत.भाजप, शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीतील नेत्यांना उमेदवारी मागण्याचा हक्क आहे. पक्षानं हाळवणकर, हिंदुराव शेळके यांना उमेदवारी दिल्यास दु:ख नाही.
शिंदेंच्या शिवसेनेकडून रवींद्र माने जोरदार तयारी करत आहेत. विठ्ठल चोपडे यांनीही तयारी करावी. महायुती जो निर्णय घेईल, तो घेईल असं म्हणत आमदार आवाडे यांनी महायुतीनं उमेदवार दिल्यास राहुल आवाडे यांना अपक्ष उतरवणार असल्याचं अप्रत्यक्षपणे सांगितलं आहे.