अमृत २ योजनेमधून येथील मोठे तळे सुशोभीकरणाचे काम गेल्या पंधरा दिवसापासून बंद अवस्थेत आहे. सदर सुशोभीकरण कामाच्या मक्तेदाराला बिल अदा केले नसल्यामुळे संबंधित मक्तेदाराने काम बंद ठेवले आहे. तेव्हा शहराच्या सौंदर्यामध्ये भर टाकणाऱ्या मोठे तळे सुशोभीकरणाचे काम तातडीने पूर्ण होण्यासाठी आयुक्त पल्लवी पाटील यांनी लक्ष द्यावे अशी मागणी शहरवासियांतून होत आहे.
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मोठे तळे परिसर सौंदर्यकरणाचे काम महानगरपालिकेच्या माध्यमातून हाती घेतले आहे. सौंदर्यकरणासाठी केंद्र व राज्य सरकारच्या अमृत-२ योजनेतून सुरू करण्यात आले असून त्यासाठी २ कोटी ८६ लाख खर्च अपेक्षित धरला आहे. त्यामध्ये महानगरपालिकेचा ८४ लाख रुपयांचा हिस्सा आहे. सौंदर्यकरणाच्या कामाला एप्रिल २०२३ मध्ये सुरू करण्यात आले होते. गेल्या वर्षभरात सुमारे ६० ते ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे. सौंदर्यकरण करण्याच्या कामात मोठे तळे येथे कारंजा, लहान मुलांची खेळणी, लाईट इफेक्ट, साऊंड इफेक्ट आदी सोयी-सुविधांचा समावेश आहे. सदर कामाच्या मक्तेदाराला महानगरपालिकेतर्फे ३५ लाखाचे एक बिल अदा करण्यात आले आहे.
त्यानंतर राज्य सरकारच्या नव्या निर्देशानुसार महानगरपालिकेने आपल्या हिशाची ८४ लाख रुपये राज्य सरकारकडे भरणे आवश्यक आहे. मात्र, सदरची रक्कम भरली नसल्यामुळे राज्य सरकारकडून संबंधित मक्तेदाराचे बिल अदा केले नाही. कामाचे बिल आले नसल्यामुळे संबंधित मक्तेदाराने गेल्या पंधरा-वीस दिवसापासून काम बंद ठेवले आहे. मोठे तळे सुशोभीकरणाचे काम पूर्ण करण्यासाठी एक वर्षाची मुदत होती. सदरची मुदत संपल्याने संबंधित मक्तेदाराला डिसेंबर २०२५ पर्यंत कामाची मदत वाढवून दिली आहे. सदर सुशोभीकरणाचे काम वेळेत पूर्ण होण्यासाठी आयुक्त पल्लवी पाटील यांनी लक्ष द्यावे अशी मागणी शहरवासियांतून होत आहे.
