इचलकरंजी विधानसभेसाठी जांभळे गटाला प्राधान्य मिळणार शरद पवार यांची ग्वाही!

सध्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाची जोरदार तयारी सुरू झालेली आहे. सभा, मेळावे यांचे आयोजन केले जात आहे. कोणत्या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळणार? याविषयी तर्कवितर्क देखील लावण्यात येत आहेत. आपापल्या परीने नेतेमंडळी उमेदवारीचे तिकीट मिळावे यासाठी धडपड करत आहेत.

अशातच इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून सुहास अशोकराव जांभळे यांना मविआची उमेदवारी मिळावी यासाठी माजी आमदार अशोकराव जांभळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कोल्हापूर येथे खासदार शरद पवार यांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या माध्यमातून इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात माजी आमदार अशोकराव जांभळे गटाने गेली चार दशके इचलकरंजी नगरपालिकेवर वर्चस्व कायम ठेवलेले आहे.

प्रत्येक निवडणुकीत जांभळे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली ताकद दाखवून दिली आहे. तसेच त्यांनी निष्ठेने प्रामाणिकपणे पक्षाला बळकटी देण्याचे काम देखील केलेले आहे. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून सुहास अशोकराव जांभळे यांनाच उमेदवारी मिळावी अशी मागणी करण्यात आली.

त्यावर आगामी विधानसभा निवडणुकीत इचलकरंजी मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहावा यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. जर हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे राहिला तर महाविकास आघाडीतर्फे उमेदवारीसाठी माजी आमदार अशोकराव जांभळे गटाला प्राधान्य देण्यात येईल अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते खासदार शरद पवार यांनी दिली.