इचलकरंजीत स्वच्छता अभियान गतीमान करण्याची गरज….

सध्या प्रत्येक भागात स्वच्छतेच्या बाबतीत अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. जेणेकरून आपला परिसर, आपला गाव स्वच्छ, सुंदर होईल. महापालिका क्षेत्रामध्ये स्वच्छता अभियान गतिमान करण्याची नितांत गरज आहे. शहरांच्या वाढत्या लोकसंख्येमुळे कचऱ्याचे प्रमाण वाढत आहे, आणि त्याचा परिणाम सार्वजनिक आरोग्यावर तसेच पर्यावरणावर होत आहे.

स्वच्छता अभियान प्रभावी करण्यासाठी महापालिका आणि नागरिकांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. म हापालिकेच्या स्वच्छता मोहिमांमध्ये अनेक वेळा अपुऱ्या सुविधा, निष्क्रिय प्रशासन, नागरिकांचा असहयोग आणि अपुरा निधी यांसारख्या कारणांमुळे शहर स्वच्छतेबाबत अपेक्षित परिणाम दिसत नाहीत. स्वच्छता अभियान केवळ महापालिकेची जबाबदारी नसून, प्रत्येक नागरिकाने यात सक्रिय सहभाग घेतल्यासच शहर स्वच्छ आणि सुंदर राहू शकते. ‘स्वच्छ शहर, आरोग्यदायी शहर’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे.

केवळ घोषणाबाजी न करता प्रत्यक्षात काम होणे गरजेचे आहे. स्वच्छतेबाबतचे नियम कठोरपणे अंमलात आणावेत. नागरिक आणि प्रशासन यांच्यात समन्वय आवश्यक आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्वच्छतेवर सतत देखरेख ठेवणे आवश्यक आहे. कचरा व्यवस्थापनाची कार्यक्षम व्यवस्था राबवून ओल्या आणि सुका कचऱ्याचे वेगळे संकलन करणे, जनजागृती आणि जबाबदारीचे वाटप करून नागरिकांमध्ये स्वच्छतेची जाणीव निर्माण करणे गरजेचे बनले आहे.