विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जागावाटपाबाबत बैठका सुरू झाल्या आहेत. महायुतीतएकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची जागावाटपावर प्राथमिक चर्चा झाली असून लवकरच महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला जाईल.
जिंकण्याची क्षमता असणाऱ्यांना उमेदवारीसाठी प्राधान्य दिले जाईल. महायुतीत जागावाटपात भाजपा मोठ्या भावाच्या भूमिकेत असणार आहे.मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ७५-८० जागा, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ६०-६५ जागा मिळण्याची शक्यता आहे.
तर भाजपा १३०-१३५ जागांवर आणि इतर छोट्या मित्रपक्षांना ३-५ जागा दिली जाईल. शिंदे-अजितदादा-फडणवीस यांच्यात जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. विद्यमान आमदार ज्या पक्षांचे आहेत त्यांना तो मतदारसंघ सुटण्याची शक्यता आहे. यातही काही जागांची अदलाबदल करण्यात येऊ शकते. मागील निवडणुकीच्या आकडेवारीनुसार, भाजपानं १६४ तर शिवसेनेनं १२४ जागा लढवल्या होत्या.
त्यात भाजपानं १०५ आणि शिवसेनेनं ५६ जागा जिंकल्या. राष्ट्रवादी काँग्रेसनं १२१ जागा लढवून त्यातील ५४ जागा जिंकल्या होत्या. मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडली आहे. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात ४० हून अधिक आमदार महायुतीत सहभागी झाले तर अजित पवारांच्या नेतृत्वातही ४० आमदार सत्तेत आले. त्यामुळे २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीतील जागावाटपात फेरबदल होतील.