Weather Update : आजही अवकाळी पाऊस! पुढील काही दिवसात तापमान वाढणार

राज्यासह देशाच्या हवामानावर वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव कायम आहे. त्यामुळे देशात काही भागात आजही पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अपडेटनुसार, डोंगराळ भागात आज मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टीची दाट शक्यता आहे. एकीकड काही भागात जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे काही ठिकाणी तापमानात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन-तीन दिवस हवामानात जास्त बदल होण्याची शक्यता नाही. मात्र, त्यानंतर तापमानात हळूहळू वाढ होईल. भारतीय हवामान खात्याने (IMD) जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये 10 मार्चपर्यंत पाऊस आणि हिमवृष्टीसाठी अलर्ट जारी केला आहे. पुढील चार दिवस देशाच्या बहुतांश भागात कोरडे हवामान राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

आयएमडीने म्हटलं आहे की, तामिळनाडू आणि केरळमध्ये दोन दिवस उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे.गेल्या काही दिवसात देशातील हवामानात मोठा बदल झाल्याचं दिसत आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, नव्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचाही परिणाम पश्चिम हिमालयीन प्रदेशावर होण्याची शक्यता आहे. येत्या 24 तासांत उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडू शकतो, तर राजस्थान, दिल्ली, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये ढगाळ वातावरण राहील.