सध्या गणेशोत्सवाची सर्वत्र धामधूम सुरू आहे. अनेक लोक हे आपल्या गावाकडे गणेशोत्सव साजरा करण्यासाठी परतत असतात. गणेशोत्सवासाठी सहपरिवार गावाकडे येण्यासाठी निघालेल्या पुण्यातील खानापूरकर आणि बेळगावकर चाकरमान्यांची अपुऱ्या बसेसमुळे त्रेधा उडाली आहे.
शुक्रवारी ६ तारखेपासून सकाळपासून स्वारगेट बस स्थानक परिसरात हजारो प्रवासी बसच्या प्रतीक्षेत ताटकळत थांबले आहेत. संध्याकाळपर्यंत या गर्दीत आणखी वाढ होणार असल्याने त्यांना वेळेत गावाकडे पोहोचण्याची चिंता लागून राहिली आहे.
खानापूर, हल्याळ, बेळगाव, चंदगड, आजरा, गडहिंग्लज या भागातील हजारो प्रवासी सकाळपासून बसच्या प्रतीक्षेत आहेत. स्वारगेट बस स्थानक परिसरात तुफान गर्दी झाल्याने मोबाईल नेटवर्कवरदेखील परिणाम झाला आहे.