खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघात विट्यातील बाबर, पाटील…..

लोकसभा निवडणुकीनंतर आता राजकीय नेतेमंडळींना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. नेतेमंडळींची जोरदार तयारी सुरू झालेली आहे. खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघात वेगळीच चर्चा सुरू झालेली आहे. खानापूर आटपाडी विधानसभेसाठी १९९५ साली अपक्ष म्हणून निवडणूक लढवत राजेंद्र देशमुख विजयी झाले होते.

त्यावेळी माजी आमदार हणमंतराव पाटील व ॲड. सदाशिव पाटील यांनी देशमुख यांना विट्यातून मदत केली. त्यामुळे कॉग्रेसचे तत्कालीन आमदार अनिल बाबर यांचा पराभव झाला होता. १९९९ आण्णा देशमुख यांनी अनिल बाबर यांना १९९९ च्या निवडणुकीत सहकार्य केले. ते पैरा फेडण्याच्या अटीवर बाबर यांना विजयी केले. खानापूर विधानसभेला विट्याच्या नेत्यांना २५ वर्षांपासून माजी आमदार राजेंद्र देशमुख मदत करून निवडून आणत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत विट्यातील माजी आमदारांचे पुत्र सुहास बाबर व वैभव पाटील हे राजेंद्र देशमुख यांचा राजकीय पैरा फेडणार का? असा सवाल आटपाडीकर उपस्थित करू लागले आहेत. सध्या माजी आमदार राजेंद्र देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील व शिवसेना शिंदे गटाचे सुहास बाबर हे सध्या महायुतीमध्येच आहेत.

आगामी खानापूर विधानसभेच्या निवडणुकीत विट्यातील पाटील व बाबर पुत्राने तरी आपल्या वडिलांसाठी झालेल्या राजकीय पैयाची परतफेड करावी, अशी मागणी आटपाडीकरांची आहे. तिघेही वेगवेगळ्या पक्षांत असले तरी सध्या ते महायुतीमध्येच आहेत. यामुळे विटेकर नेत्यांनी मोठे मन दाखवून आता आटपाडीचा पैरा फेडण्याची वेळ आल्याची चर्चा आहे.