सांगलीत जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी; दिवाळी पाण्यात

 सांगली शहर व परिसरात तसेच जिल्हाभरात झालेल्या मुसळधार पावसाने दाणादाण उडाली. सलग तीन तास झालेल्या या पावसाने दिवाळीसाठी सजलेल्या व्यापारी पेठात पूर यावा, तसे पाणी साचले. त्यामुळे स्टॉलधारकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे चित्र होते. कालपासून जिल्हाभरात ढगाळ वातावरण कायम आहे.

याचा फटका द्राक्षबागांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. सांगली जिल्ह्यात १ लाख २५ हजार एकरावर द्राक्षबागा आहेत. पावसाने फुलोरा अवस्थेत असलेल्या बागात डाऊनी व घडकूजीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. गुडघ्याएवढे पाणी साचल्याने शेतकऱ्यांसमोर संकट उभे ठाकले आहे.

या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांसह फेरीवाले, व्यापारी यांचेही मोठे नुकसान झाले आहे. मुळात सांगली महापालिकेने आंबेडकर क्रीडांगणावर स्टॉल लावण्याची व्यवस्था केली आहे. मात्र प्रचंड पावसाने विक्रेत्यांना साहित्य पाण्यातून हलवावे लागले. त्याचा फटका विक्रेत्यांना बसला.

कालपासून बाजारात खरेदीसाठी गर्दी होत आहे. मात्र प्रचंड पावसामुळे या सर्व खरेदीवर विरजण पडले. शहरातील प्रसिध्द मारुती रस्त्यावर पावसाने प्रचंड पाणी साठल्याने दिवाळीसाठी सजलेल्या मुख्य व्यापारी पेठेची दैना उडाली. व्यापाऱ्यांच्या दुकानातही पाणी घुसले. तात्पुरते उभारलेले मंडपासह स्टॉलचे नुकसान झाले. स्टेशन चौक, कापड पेठ, विश्रामबाग, विजयनगर येथील बाजारपेठेत ऐन दिवाळीत विक्रेत्यांचे हाल झाल्याचे चित्र होते. शहरातील मुख्य रस्त्यांसह उपनगरात पाण्याचे लोट वाहत होते.