अलीकडच्या काही महिन्यामध्ये सांगली जिल्ह्यात चोरीच्या प्रकारात वाढ झालेली दिसून येत आहे. तसेच गावोगावी गस्त देखील वाढवण्यात आलेली आहे. अशातच हातकणंगले तालुक्यात देखील चोरीच्या प्रकारात वाढ झालेली आहे. हातकणंगले तालुक्यातील मजले गावच्या हद्दीतील लक्ष्मी मागासवर्गीय संस्थेत चोरी करण्याच्या प्रयत्नातील चार महिलांना पोलिसानी रंगेहाथ पकडले.
मंगल मोहन गोसावी (वय ४५), रेखा विनोद गोसावी (वय ४० दोघी रा. एमएसईबी कार्यालयासमोर हातकणंगले), आक्काताई उत्तम जुवे (वय ५०), कल्पना सुभाष गोसावी (वय ५० दोघी रा. गोसावी गल्ली लक्ष्मी माळ हातकणंगले) अशी अटकेतील महिलांची नांवे आहेत.
हातकणंगले पोलिस ठाण्याच्या हद्दीत रात्रीची गस्त चालू असताना या संस्थेत काही महिला रात्री २ वा. च्या दरम्यान चोरी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने सापळा रचून पोलिसांनी चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या महिलांना रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले.
याबाबत लक्ष्मी औद्योगिक संस्थेचे विकास तातोबा घाटगे (रा. – मिणचे) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.