आटपाडी तालुक्यात अनेक गावांमध्ये चोर आल्याच्या अफवांनी नागरिक भयभीत होत आहेत. तसेच गावा-गावामध्ये रात्रीच्या वेळी ड्रोन दिसत असल्याने नागरिकांमध्ये चोरीच्या शंका व्यक्त होत आहेत. दरम्यान बुधवारी रात्री आटपाडी शहरासह तालुक्यात अनेक गावांमध्ये ड्रोनचे दर्शन झाले. चोरट्यांमार्फत ड्रोनद्वारे कोणते घर बंद आहे किंवा चोरी करणे सोपे आहे? याची चाचपणी सुरू असल्याच्या अफवा पसरत आहेत.
तसेच करगणी, तडवळे, शेटफळे या परिसरात चोर आल्याच्या संशयावरून गोंधळ उडाला होता.
करगणीतील बंडोबाचा म्हसोबा परिसरात एका घरातील युवकावर हल्ला झाल्याचे संदेश समाजमाध्यमांवरून पसरल्यानंतर खळबळ उडाली. पोलिसांनाही गावात पाचारण करण्यात आले. परंतु हाती काहीही लागले नाही.
गेल्या काही दिवसापासून आटपाडी तालुक्यात विनापरवाना ड्रोनची दहशत आहे. रात्री अपरात्री फिरणारे ड्रोन नेमके कोण कशासाठी उडवते? याचे गुढ देखील कायम आहे. तसेच चोरट्यांच्या अफवांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. तसेच जोरदार चर्चा देखील सुरू झालेली आहे. त्यामुळे आटपाडी तालुक्यात गावोगावी आता तरुणांनी गस्त सुरू केलेली आहे.
