शिरोलीत मद्यपीची केएमटी बसवर दगडफेक, तीन प्रवासी जखमी

हातकणंगले तालुक्यातील शिरोली पुलाची येथील दिल्ली दरबार हॉटेल जवळ रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीने दारूच्या नशेत बसवर दगडफेक केल्याची घटना घडली. यामध्ये बसमधील तीन प्रवासी जखमी झाले. त्यांच्यावर शिरोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे पाठवण्यात आले. कोल्हापूरहून शिरोली माळवाडी आणि पेठवडगावकडे निघालेल्या केएमटी बसवर नागेश अर्जुन वाईडे (रा. जालना) याने दारूच्या नशेत दगडफेक केल्याने बस मधील राहूल सुनीलकुमार चोपडे (वय २५, भादोले ), संचिता नितीन कांबळे (वय १७ ) स्नेहल सुनिल कांबळे (वय २१ ) हे तिघे प्रवासी गंभीर जखमी झाले.

त्यांच्यावर प्राथमिक उपचारासाठी शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून पुढील उचारासाठी कोल्हापूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बस शिरोली फाट्या शेजारी असणाऱ्या दिल्ली दरबार हॉटेल जवळ आल्यावर वाईडे याने बसवर दगडफेक केल्याने हे तिघे जखमी झाले.

पुलाची शिरोली येथे परभणीतील घटनेच्या निषेधार्थ गाव बंद करण्यात आला होता. अत्यंत शांततेत सर्व पक्षीय बंद पार पडला असताना बसवर दगडफेक करण्यात आली पण याचा बंद आंदोलनाशी कसलाही संबंध नव्हता. आरोपी तात्काळ मिळाल्याने पोलिसांचा जिव भांड्यात पडला.