Youtube व्हिडीओ लाईक केले अन् ५० लाख गमावून बसला

रिकाम्या वेळेत युट्यूबवर वेळ घालवणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. मात्र युट्यूबवर तुम्हीही व्हिडीओ पाहत असाल आणि एखादा व्हिडीओ लाईक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर आहे. 

डिजिटल युगात लोक स्मार्ट झाले आहेत. मात्र काही लोकांना असलेल्या अपुऱ्या माहितीचा गैरफायदा सायबर गुन्हेगार घेताना दिसतात. सायबर ठग वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरुन लोकांचा फसणूक करत असतात. असाच एक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. ज्यामध्ये YouTube चे व्हिडीओ लाईक करण्याच्या नावाखाली एका व्यक्तीला ५० लाखांचा फटका बसला आहे. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील शुलभ नांगर नावाच्या तरुणाची सायबर चोरट्यांची फसवणूक केली आहे. यूट्युबला सबस्क्राइब आणि लाइक करण्यासाठी चांगले कमिशन देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एका तरुणाला ५० लाख रुपयांना गंडा घातला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी फिर्यादी शुलभ नांगर यांना मोबाईलवर संपर्क साधला. त्यांनी यूट्युबला सबस्क्राइब आणि लाइक करण्यासाठी आकर्षक कमिशन मिळेल, असे सांगितले. त्यानुसार आरोपींनी नांगर याला सुरवातीला १३५० रुपये कमिशनही दिले.

त्यानंतर टेलिग्राम ॲपवर लिंक पाठवून कमिशनचे आमिष दाखवून व्यवसायात गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने वेळोवेळी ४९ लाख ६८ हजार रुपये घेतले. त्यानंतर आपल्याला कुठलेच कमिशन मिळाले नाही आणि आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्याने पोलीस ठाणे गाठले. पोलिसांना गुन्हा दाखल करुन अधिक तपास सुरु केला आहे.