भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत विकास कामांसाठी ५ कोटी निधी मंजूर

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांमध्ये सन २०२३- २४ या वर्षातील विविध विकास कामांसाठी राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील व पालकमंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून ५ कोटी निधी मंजूर झाल्याची माहिती मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे.

सदर निधीतून मतदारसंघाच्या पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील विविध गावांच्या दलित वस्तीमध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या विकासासाठी व्यायामशाळा बांधणे, अभ्यासिका उभारणे, समाज मंदिर बांधणे व दुरुस्ती करणे, संविधान भवन बांधणे, दलित वस्ती अंतर्गत रस्ते सुधारणा व काँक्रिटीकरण करणे आदी विकास कामांचा समावेश असल्याची माहिती आ. आवताडे यांनी दिली आहे.

विकासापासून वंचित असणाऱ्या दलित घटकांच्या विकासासाठी आ. समाधान आवताडे यांनी एवढा मोठा निधी उपलब्ध करून दलितांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मोठी चालना दिली आहे. दलितवस्तीसाठी मंजूर झालेल्या या निधीतून अनेक कामे मार्गी लागणार असून याचा फार मोठा फायदा दलित समाजाला होणार आहे. मतदारसंघातील दलित घटकांच्या विकासासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रथमतःच निधी मंजूर झाल्याने संपूर्ण दलित समाज आ. आवताडे यांच्या कार्यपद्धतीवर जाम खुश झाला आहे