मराठा आंदोलनाचा खासदार माने यांना फटका बसणार का?

पेठवडगाव येथे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये माजी आमदार सुजित मिणचेकर यांच्या विरुद्ध ‘आमदार चले जाव असा नारा पेठ वडगावातून देण्यात आला आणि विधानसभेमध्ये मिणचेकर यांचा पराजय झाला. सद्या ‘खासदार हरवले…. शोधून द्या, शोधून द्या खासदार माने शोधून द्या’ असे नवे घोषवाक्य चर्चेत आले. निमित्त होते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उभारलेले पेठवडगावातील मराठा आंदोलन. वडगावसह २५ गावांतील सकल मराठा समाजाकडून उभारण्यात आलेल्या आंदोलनात ‘खासदार हरवले…

असा सूर आळवला गेला. तसेच खासदार हरवलेचा डिजीटल फलक झळकला. या आंदोलनाची जिल्ह्यासह राज्यात चर्चा झाली. मात्र मिणचेकर यांच्या पराभवा सारखा खासदार माने यांना पराभव पत्करावा लागणार का ? अशी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे.. सकल मराठा समाजाने ठरवले प्रमाणे सर्व लोकप्रतिनिधींना गावबंदी करण्यात आली. जिल्ह्यासह राज्यातील अनेक मंत्री, आमदार खासदार यांना आपल्याच मतदारसंघात गावबंदीचा सामना करावा लागला. हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजूबाबा आवळे यांची गाडी मराठा समाजाने पेठवडगावात अडवली व त्यांच्याकडे राजीनामा मागितला.

पण खासदार धैर्यशील माने मतदारसंघातील आंदोलनात फिरकलेच नाहीत. या रागातून आंदोलनाचे परिवर्तन वेगळ्याच आंदोलनात झाले. ‘खासदार धैर्यशील माने हरवले… असा भव्य डिजिटल फलक घेऊन सकल मराठा समाजाने आंदोलन केले. हे आंदोलन एवढ्यावर न थांबता आंदोलक थेट पोलीस स्थानकात पोचले. तिथे पोलीस अधिकाऱ्यांना खासदार माने हरवलेचे निवेदन दिले. या घटनेवरून हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील लोक तीव्र नाराज असल्याची भावना प्रकट झाली असे मानले जात आहे. खासदार धैर्यशील माने मतदारसंघात कमी दिसून येत आहेत. आम्ही लोकसभेमध्ये कायदे बनवण्यासाठी जातो’ असं त्यांनी एका कार्यक्रमांमध्ये स्पष्ट केलं होतं पण लोकप्रतिनिधी हा जनतेतून निवडला जातो. जनतेमधून निवडून आल्यानंतर लोकप्रतिनिधीने जनतेशी संवाद ठेवायचा असतो. तो संवाद खासदार धैर्यशील माने यांनी ठेवलेला नाही हे स्पष्ट झाले. कायदे बनवण्याच्या नादात जनसंपर्कातून होणारा मताधिक्याचा फायदा खासदार सोयीस्कररित्या विसरले आहेत. यामुळे आपल्या नेत्यालाही | पराभवाचा फटका बसतो की काय? अशी भीती माने समर्थकात वाटू लागली आहे.