कोरोना नंतर एसटी महामंडळाचा गाडा तोट्याच्या गाळात रुततच चालला होता. परंतू यंदाच्या उत्सवी हंगामात नऊ वर्षानंतर प्रथमच एसटी फायद्यात आली आहे. तब्बल ९ वर्षांनंतर एस.टी.महामंडळ पहिल्यांदाच ऑगस्ट २०२४ मध्ये १६ कोटी ८६ लाख ६१ हजार रुपये फायद्यात आले असल्याचे एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी म्हटले आहे. त्यामुळे एसटी महामंडळात आनंदाचे वातावरण आहे. एकतर गणपती सणाच्या तोंडावर केलेल्या आंदोलनानंतर एसटी महामंडळाला सहा हजार रुपये मूळ वेतनात वाढ मिळाली आहे. त्यात नेहमीच तोट्यात असलेली एसटी संपूर्ण ऑगस्ट महिन्यात फायद्यात राहीली आहे.
२० विभागांनी नफा कमवला
ऑगस्ट महिन्यात ३१ विभागांपैकी २० विभागांनी नफा कमवला आहे. या महिन्यात एसटी महामंडळाचा १६ कोटी ८६ लाख, ६१ हजार रुपये इतका नफा झालेला आहे. तब्बल ९ वर्षांनी, ऑगस्ट-२०२४ मध्ये एसटी महामंडळ नफ्यात आल्याने उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. एसटी गणपती स्पेशल गाड्यांमुळे दोन लाख चाकरमानी यंदा कोकणात रवाना झाले. त्यानंतर आता परतीच्या प्रवास देखील एसटीला नव्या शिखरावर पोहचविणार आहे. एसटी आता साध्या टु बाय टु आसनाच्या अशोक लेलॅण्ड कंपनीच्या बसेस देखील टप्प्या टप्प्याने दाखल होणार आहेत. या बसेस लांबपल्ल्याच्या मार्गासाठी उत्तम ठरणार आहेत. त्यामुळे एसटी उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे.