आगामी विधानसभा निवडणुकीमुळे राजकारणात उलटसुलट चर्चा,आखणी, सभा मेळावे, उमेदवारी बाबतीत तर्कवितर्क पाहायला मिळत आहेत. विटा येथे शुक्रवारी राजेंद्रअण्णा देशमुख यांच्या कार्यकर्त्यांनी सुहास बाबर यांची भेट घेऊन निवडणुकीबाबत चर्चा केली. बाबर कुटुंबीयांना राजेंद्रअण्णा देशमुख यांनी चार वेळा मदत केली आहे. त्यामुळे सुहासभैया, यंदा तुम्ही विधानसभेला उतरू नका. राजेंद्रअण्णांना पाठिंबा देऊन दिवंगत आमदार अनिलभाऊंनी दिलेला शब्द पाळा, असे साकडे शुक्रवारी देशमुख गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी महायुतीचे संभाव्य उमेदवार सुहास बाबर यांना घातले. खानापूर विधानसभा मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीत राजकीय उलथापालथ सुरू आहेत.
आटपाडीचे महायुतीतील भाजपचे माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांचे प्रमुख कार्यकर्ते शुक्रवारी विट्यात दिवंगत आमदार अनिल बाबर यांच्या घरी दाखल झाले. त्यांनी महायुतीचे संभाव्य उमेदवार सुहास बाबर यांच्याशी चर्चा केली. सुहास बाबर यांनी गेल्या निवडणुकीत काय चर्चा झाली किंवा काय शब्द दिला याबाबत अनिलभाऊ, राजेंद्रअण्णा, अमरसिंह देशमुख यांच्यासह कोणीही काहीही सांगितले नाही.
आता मी निवडणूक लढवली नाही, तर कार्यकत्यांना काय उत्तर देणार, असा प्रश्न उपस्थित केला. यावर कार्यकत्यांनी मागील २ विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही अनिल बाबर यांचे प्रामाणिकपणे काम केले आहे. त्यामुळे आपण फेरविचार करून यंदा राजेंद्रअण्णा देशमुख यांना सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी आपल्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचवून चर्चा करू, असे सुहास बाबर यांनी स्पष्ट केले.