विधानसभा निवडणुकीला महायुतीला…..

विधानसभा निवडणुकीची तयारी करत असताना अनेक नेते मंडळींची हालचाल सुरू आहे. देशात व राज्यात सत्तेत सहभागी असलेल्या महायुतीची विधानसभेच्या निवडणुकीत कसोटी लागणार आहे. सांगली व हातकणंगले या दोन्ही मतदार संघात गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार विजयी झाले होते.

मात्र या निवडणुकीतील चित्र बदलले आहे. सांगली भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांचा अपक्ष उमेदवार खासदार विशाल पाटील यांनी पराभव केला होता. सांगली लोकसभा मतदारसंघात सांगली, मिरज, जत, तासगाव- कवठेमंकाळ, पलूस- कडेगाव, खानापूर आटपाडी हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये जत वगळता सर्व मतदारसंघातून खासदार विशाल पाटील आघाडीवर आहेत.

खानापूर- आटपाडी विधानसभा मतदार संघामध्ये महायुतीत उमेदवारीवरून वाद रंगला आहे. महायुतीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेनेची ही जागा आहे. या ठिकाणी स्व. अनिल बाबर आमदार होते आता त्यांचे पुत्र सुहास बाबर लढणार आहेत. तर दुसरीकडे महायुतीत सामील झालेल्या राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी देखील विधानसभेच्या उमेदवारीचा दावा केलेला आहे. तर भाजपकडून आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर हे देखील निवडणुकीच्या तयारीत आहेत.

महायुतीतील भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी या तिन्ही पक्षात उमेदवारीवरून चांगलाच खेळ रंगला आहे. भविष्यात ही जागा कोणाला मिळणार आणि इतरांची नाराजी दूर होणार का?हे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला महायुतीला मोठी ताकद लावावी लागणार आहे.