Edible Oil : महागाईचे विघ्न! खाद्यतेल प्रतिकिलो २० रुपयांनी महागले

गणेशोत्सवानंतर येणाऱ्या सणासुदीच्या आनंदावर विरजण पडणारी बातमी आहे. कारण रिफाइंड सनफ्लॉवर ऑइल आणि अन्य खाद्य तेलावरील कस्टम ड्युटी वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.आयात शुल्कात २० टक्के वाढ करण्यात आल्याने खाद्य तेल महागले आहे.

सोयाबीन, राइस ब्रॅण्ड, वनस्पती तूप, सरसो तेलाच्या दरात प्रतिकिलो २० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे अनेकांचे बजेट बिघडणार आहे. गणेशोत्सव संपताच पितृ पंधरवडा व तो संपला की नवरात्र उत्सव सुरू होईल, त्यानंतर दिवाळी. नवरात्रात नऊ दिवसांचे उपास असतात, दिवाळीत फराळ बनवितात.

यासाठी खाद्य तेल अधिक वापरले जाते. क्रूड आणि रिफाइंड पाम तेल, सोयाबीन तेल आणि सनफ्लॉवर सीड तेल यावर बेसिक कस्टम ड्यूटी वाढवण्यात आली आहे. कस्टम ड्यूटीचे दर आत्तापर्यंत शून्य होते. म्हणजेच या तेलावरील आयात शुल्क लागत नव्हते.आता हेच आयात शुल्क वाढून २० टक्के करण्यात आले आहे.

तर, रिफाइंड सनफ्लॉवर सीड ऑइल, रिफाइंड पाम ऑइल, रिफाइंड सोयाबीन तेलावर बेसिक ड्युटीचे दर वाढवून ३२.५ टक्के केली आहे. बाजारात कस्टम ड्यूटी वाढणार असे संकेत असल्याने तीन दिवसांपासूनच भाववाढ सुरू होती. त्यामुळे आतापर्यंत २० रुपये वाढ झालेली आहे.

सणासुदीच्या तोंडावर खाद्य तेलावरील आयात शुल्कात वाढ केल्याने खाद्य तेलांच्या किमती वाढलेल्या आहेत. ऑक्टोबर महिन्यात नवरात्र, दसरा, दिवाळी सण आहेत. अशावेळी सणासुदीच्या दिवसांत खाद्य तेलांच्या किमतीत अजून वाढ होण्याची शक्यता आहे.