करमाळ्यातून पुन्हा एकदा आमदार होण्यासाठी विद्यमान आमदार संजय शिंदे व माजी आमदार नारायण पाटील यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. आमदार शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सत्तेत असूनदेखील ते अद्याप राष्ट्रवादीकडून लढण्यास इच्छुक नसल्याचे चित्र आहे.तर दुसऱ्या बाजूला माजी आमदार नारायण पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केल्याने त्यांची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निश्चित मानली जात आहे.
करमाळा विधानसभा मतदारसंघात आमदार शिंदे, माजी आमदार पाटील, माजी आमदार जयवंतराव जगताप, भाजपच्या रश्मी बागल, दत्तकाला शिक्षण संस्थेचे प्रा. रामदास झोळ, शिवसेना शिंदे गटाकडून महेश चिवटे यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याबाबत भूमिका स्पष्ट केल्या आहेत. याशिवाय अन्य इच्छुकांची संख्यादेखील मोठी आहे. करमाळ्यात इच्छुकांची संख्या जरी मोठी असली तरी यातील अनेकजण कोणत्या पक्षाकडून लढणार हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे.
करमाळा तालुक्याच्या राजकारणात मोहिते-पाटलांची भूमिका अनेक वर्षांपासून महत्त्वाची राहिली आहे. या विधानसभेच्या निवडणुकीत मोहिते-पाटील हे ठामपणे आणि उघडपणे माजी आमदार पाटील यांच्या पाठीशी उभा राहणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या वेळी माजी आमदार पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करत खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यासाठी प्रचार केला. एकूणच मोहिते-पाटील आणि नारायण पाटील यांचे असलेले संबंध त्याचा देखील येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पाटील यांना फायदा होणार आहे.