सार्वजनिक गणेश विसर्जनामुळे एसटी मार्गात बदल

उद्या मंगळवारी 17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असल्याकारणाने सार्वजनिक गणेश विसर्जन होणार आहे. यासाठी इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने यंत्रणा सज्ज ठेवण्यात आलेली आहे. या गणेश विसर्जनामुळे वाहतूक मार्गात देखील बदल करण्यात आलेला आहे. राजवाडा चौकात गणेशोत्सवानिमित्त एसटी वाहतूक मार्गात बदल करण्यात आला असून सांगली मिरज आणि जयसिंगपूर येथून इचलकरंजीकडे येणाऱ्या एसटी बसेस या बिग बाजार चौकातून थोरात चौकाकडे येत असल्याबाबत तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत.

त्यामुळे राजवाडा येथे उतरणाऱ्या प्रवाशांचे हाल होत असून त्यांना नाहक आर्थिक भुर्दंड बसत आहे. याबाबत एसटी महामंडळाचे आगार व्यवस्थापक यांनी तातडीने दखल घेत सर्व बसेस सांगली वेस मारुती मंदिर चौकातून थोरात चौकाकडे नेण्याचे आदेश दिले आहेत. तशा सूचना देखील त्वरित दिलेल्या आहेत.

अनंत चतुर्दशी निमित्त विसर्जन मिरवणुका व भाविकांची होणारी गर्दीच्या अनुषंगाने १७-९-२०२४ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून मिरवणूक संपेपर्यंत वाहतूक मार्गात पुढील प्रमाणे बदल करण्यात आलेला आहे. याबाबतचा जाहीरनामा जिल्हापोलिसप्रमुख महेंद्र पंडित यांनी प्रसिद्ध केला आहे. सार्वजनिक गणेशमुर्ती विसर्जन मुख्य मार्ग शाहु पुतळा-शिवतीर्थ-जनता चौक- गांधी पुतळा झेंडा चौक-मरगुबाई मंदिर चौक ते नदी घाट असा असणार आहे. सांगली, जयसिंगपुरकडुन यड्राव फाटा मार्गे इचलकरंजी शहरात येणा-या वाहनांसाठी झेंडा चौक-गांधी पुतळा-जनता चौक-हवामहल बंगला-शिवतीर्थ कडे येणा-या सर्व प्रकारच्या वाहनांना व एसटी बसेसला बंदी घालण्यात येत आहे.


पर्यायी मार्ग वरील सर्व प्रकारची वाहतुक फॉरच्युन प्लाझा येथुन लालनगर-थोरात चौक-डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा या मार्गाने एसटी स्टैंड व शाहु पुतळा कडे येतील व सांगला/जयसिंगपुर कडे जाणा-या सर्व प्रकारच्या वाहनांना व एसटी बसेसची वाहतुक त्याच मार्गाने परत जातील.मिरवणुकीचा मुख्य मार्ग छ. शाहु महाराज पुतळा पासुन शिवतीर्थ, जनता चौक, गांधी पुतळा, झेंडा चौक, मरगुबाई मंदिर चौक ते पंचगंगा नदीघाट या मार्गास जोडणा-या सर्व पोट रस्त्यावरुन येणा-या सर्व प्रकारच्या वाहनांना मुख्य विसर्जन मार्गावर येण्यास व वाहन पार्कींग करण्यास मनाई करण्यात येत आहे.

कुरुंदवाड, अब्दुललाट, शिरदवाड, हुपरी, कागल, निपाणी व कर्नाटकातुन येणारी सर्व प्रकारची वाहतुक ही पंचगंगा पुल येथुन इचलकंरजी शहरात येण्यास बंदी घालण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग – त्यांना पर्यायी मार्ग पटटणकोडोली-इंगळी, रुई पुल-कबनूर मार्गे येतील व त्याच मार्गाने परत जातील तसेच कुरुंदवाड, बोरगांव व कर्नाटकातुन इचलकरंजी कडे येणा-या सर्व प्रकारच्या वाहनांना अब्दुललाट-हेरवाड-कुरुंदवाड-शिरढोण-टाकवडे-महासत्ता चौक-थोरात चौक-आंबेडकर पुतळा मार्गे इचलकरजी शहरात येतील व त्याच मार्गाने परत जातील.