आटपाडीत बचत भवन नूतनीकरण कामास प्रारंभ

आटपाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर बचत भवन काही वर्षांपासून बंद असल्याने बचत भवनची दुरवस्था झाली होती. काचा फुटल्या असून जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. रंग उडून गेला आहे. भवनाच्या दुरुस्ती व नूतनीकरण कामाचा प्रारंभ
जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील यांच्या हस्ते झाला. बचत भवनाच्या इमारतीचा वापर मतमोजणी, विविध शिबिरे यासह विविध प्रशासकीय कामांसाठी केला जात होता. वापरात असेपर्यंत ते सुस्थितीत होते.

मात्र काही वर्षांपासून वापर बंद झाल्याने दुरवस्था झाली आहे. प्रशासनाने मॉलसाठी भाडेतत्त्वावर दिले होते. तोदेखील काही वर्षांपासून बंद झाल्याने दुरवस्था झाली आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी संतोष लांडगे व अमोल लांडगे यांनी सहकाऱ्यांसोबत पंचायत समितीसमोर आंदोलन केले होते. त्याची दखल घेऊन दिवंगत आमदार अनिल बाबर यांच्या माध्यमातून तानाजी पाटील यांनी दुरुस्तीसाठी २० लाख रुपये मंजूर करून घेतला. या कामाचा शुभारंभ नुकताच झाला.