आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला प्रत्येक पक्षातून जोरदार तयारी सुरू असलेली पाहायला मिळत आहे. उमेदवारी बाबतीत तर्क वितर्क देखील लावण्यात येत आहेत. कार्यकर्त्यांची घालमेल देखील सुरू झालेली आहे. आगामी इचलकरंजी विधानसभा निवडणुकीत भाजपकडून माजी आमदार व भाजप प्रदेश उपाध्यक्ष मा. सुरेश हाळवणकर यांनाच उमेदवारी द्यावी, अशी ठाम मागणी भाजप कार्यकर्त्यांकडून होत आहे. व्हॉट्सअपच्या माध्यमातून भाजप कार्यकर्त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत बाहेरील उपरा उमेदवार इचलकरंजीत लादण्यास कडाडून विरोध केला आहे.
कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले की, मा. सुरेश हाळवणकर हेच इचलकरंजीसाठी सर्वात योग्य उमेदवार आहेत आणि गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांनी भाजपची ताकद जिल्ह्यात वाढवण्यासाठी भरीव योगदान दिले आहे.
भाजपच्या स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांनी त्यांच्या वरिष्ठ नेत्यांना याची जाणीव करून दिली आहे की, कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपची मुळे रुजवण्यासाठी व पक्ष मजबूत करण्यासाठी हाळवणकर यांचे योगदान अतुलनीय आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांनाच उमेदवारी दिली पाहिजे. जर असं न झालं आणि बाहेरील उमेदवार लादला गेला तर भाजप कार्यकर्त्यांकडून तीव्र विरोध होईल असा इशारा देण्यात आला आहे. याबाबत कार्यकर्त्यांच्या व्हॉट्सअपवर जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी हाळवणकर यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जावी अशी मागणी केली आहे.