खानापूर मतदारसंघामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाकडून स्व.आमदार अनिलभाऊ बाबर यांचे पुत्र सुहास भैया बाबर, भाजपकडून माजी समाज कल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील हे प्रमुख इच्छुक आहेत. परंतु हे तिघेही महायुतीकडून प्रमुख दावेदरी सांगत आहेत.
दरम्यान आता नव्याने भाजपचे माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांची देखील भर पडली असून त्यांनी देखील विधानसभेसाठी शड्डू ठोकत विधानसभा निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत. महाविकास आघाडीच्या विधानसभेच्या जागा वाटपात खानापूर विधानसभा मतदारसंघ उबाठा शिवसेना वाट्याला आहे. त्यामुळे हा मतदारसंघ उबाठा शिवसेनेकडे आहे.
तर राष्ट्रवादीच्या अजित दादा गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैभव पाटील आणि आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांनी देखील विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे वैभव पाटील आणि राजेंद्र अण्णा देशमुख यांना निवडणूक लढवायची झाल्यास शिवसेना उबाठा किंवा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हेच दोन पर्याय आहेत. त्यामुळे आटपाडीचे देशमुख आणि विट्याचे पाटील हे पुन्हा राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटाकडे घर वापसी करणार असल्याची चर्चा सध्या राजकीय पटलावर सुरू आहे.