खरसुंडीमध्ये ग्रामीण रुग्णालय मंजूर!परिसरातील रुग्णांना होणार फायदा

श्री सिद्धनाथ देवस्थान असलेल्या आटपाडी तालुक्यातील खरसुंडी येथे तीस खाटांचे ग्रामीण रुग्णालय विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मंजूर केल्याची माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली.

खरसुंडी येथे सध्या प्राथमिक आरोग्य केंद्र असून आटपाडी पश्चिम भागामध्ये या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रुग्णांची मोठी गर्दी असते. देवस्थान असल्याने भक्तांची मोठी वर्दळ नेहमीच असते, शिवाय खरसुंडीअंतर्गत नेलकरंजी, धावडवाडी आवटेवाडी, चिंचाळे, वलवण, घरनिकी यासह अन्य गावे व वाड्या-वस्त्या मोठ्या प्रमाणात आहेत. अनेक रुग्णांना काही वेळा खाजगी रुग्णालयात उपचारासाठी जावे लागत होते.

सध्या असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी वर्ग, तसेच भौतिक सुविधाही कमी पडत होत्या. या सर्व गोष्टींचा विचार करून पडळकर यांच्या प्रयत्नाने ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय मंजूर केले आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रात अन्य सुविधा नसल्याने रुग्णांना पुढील उपचारासाठी आटपाडीला जावे लागत होते. याबाबत खरसुंडी व परिसरातील नागरिकांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडे खरसुंडी येथे ग्रामीण रुग्णालय करण्याची मागणी केली होती.