लैंगिक छळाला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या

 आटपाडी,  करगणी (ता. आटपाडी) येथील १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीने सोमवार सकाळी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले होते. या आत्महत्या प्रकरणी आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. पिडित मुलीवर चार युवकांनी लैंगिक अत्याचार करत त्याचे अश्लिल व्हिडिओ बनवून छळ करत असल्याच्या कारणावरून मुलीने आत्महत्या केल्याची फिर्याद आटपाडी पोलिसात देण्यात आली आहे. याप्रकरणी चौघां जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

 याबाबत अधिक माहिती अशी, करगणी येथील अल्पवयीन मुलीने सोमवारी सकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्या केलेल्या अल्पवयीन मुलीचा चार युवकांनी लैंगिक छळ केल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी दिली आहे. पिडितेने रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घरी जेवत असताना गावातील राजू गेंड, रामदास गायकवाड, रोहित खरात, व बनपुरी येथील अनिल काळे हे शाळेला जात असताना मला त्रास देतात. त्यांनी माझा लैंगिक छळ केला आहे. त्याचे व्हिडीओ चित्रीकरण देखील केले आहे, अशी माहिती वडिलांना दिली. यानंतर वडिलांनी तिला याबाबत सकाळी बघू असे सांगितले. यानंतर पीडित मुलीने सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला.

 यानंतर मयत मुलीच्या वडिलांनी आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून आपल्या मुलीला मानसिक व शारीरिक त्रास देऊन तिचे आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत राजू विठ्ठल गेंड, रामदास गायकवाड, रोहित सर्जेराव खरात (सर्व रा. करगणी ) आणि अनिल नाना काळे (रा. बनपुरी) यांनी मुलीचा लैगिंक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केलेबाबत गुन्हा दाखल केला आहे. राजू गेंड आणि रामदास गायकवाड यांना अटक केली असून अन्य दोन आरोपी फरार आहेत.

 मोठे रॅकेट उघडकीस येणार… या लैंगिक अत्याचारातील मुख्य आरोपीच्या मोबाईल मध्ये अनेक महिला आणि मुलीचे लैंगिक चित्रण केल्याच्या चित्रफिती असल्याचे चौकशीत समोर आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे करगणीत आणखी मोठे सेक्स रॅकेट उघडकीस येणार असल्याची खात्रीशीर माहिती पुढे आली आहे.