महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून याच अनुषंगाने राजकीय घडामोडी सुरु असल्याचे दिसत आहे. सध्या सर्वच पक्ष हे निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. त्यातच आता महायुतीच्या गोटातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीमधून बाहेर पडावे, यासाठी भाजप आणि शिंदे गटाकडून सातत्याने प्रयत्न सुरु असल्याचा दावा महाविकासआघाडीतील मोठ्या नेत्याने केला आहे. त्यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे.
दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांनी महायुतीमधून बाहेर पडावे, यासाठी भाजप आणि शिंदे गटाकडून पद्धतशीरपणे प्रयत्न सुरु आहेत. अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपापूर्वी बाहेर पडावे, यासाठी भाजप आणि शिंदे गटाकडून चक्रव्यूह रचण्यात येत आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.भाजपच्या नेत्यांनी कोणत्याही परिस्थितीत 160 जागा लढवण्याचा चंग बांधला आहे. त्यामुळे शिंदे गट आणि अजित पवार गटापैकी एकाला जागावाटपात नमते घ्यावे लागणार आहे. पण तसे न झाल्यास महायुतीत तिढा निर्माण होऊ शकतो, असं म्हटलं जात आहे.
यादृष्टीने आता भाजप आणि शिंदे गटाकडून अजित पवार बाहेर पडावे यादृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. महायुतीतील जागावाटपाच्या अंतिम टप्प्यात अजित पवार जर बाहेर पडले, तर आपल्याला अधिकाअधिक जागा लढवता येतील, अशी चर्चा भाजप आणि शिंदे यांच्यात रंगली आहे. त्यामुळे या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. मात्र केंद्रातील नेतृत्वाने याबाबत अद्यापही ग्रीन सिग्नल न दिल्याने महायुतीत जागा वाटपात समस्या निर्माण होऊ शकतात, असे म्हटले जात आहे.