मोदी सरकार सर्जिकल स्ट्राईक 3.0 करणार का? पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, पाकिस्तानला धडा शिकवण्याची नेटिझन्सकडून मागणी

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्यात आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला आहे. या भयानक घटनेनंतर सोशल मीडियावर संतापाची लाट पसरली आहे. ट्विटर आणि इतर प्लॅटफॉर्मवरील नेटिझन्स ‘सर्जिकल स्ट्राइक (Surgical Strike) 3.0’ ची मागणी करत आहेत. सोशल मीडियावर नेटीझन्सनी मोदींच्या ट्विटला रिट्विट करत सर्जिकल स्ट्राइकची मागणी केली आहे.

एका यूजरने आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ‘आता वेळ आली आहे जेव्हा भारताने केवळ इशारे देण्याऐवजी किंवा प्रत्युत्तरात्मक कारवाई करण्याऐवजी दहशतवादाच्या तळांवर थेट आणि निर्णायक हल्ला करावा.’ तथापी इतर वापरकर्त्यांनी लिहिले आहे की, ‘आता कोणतेही इशारे देण्याची गरज नाही किंवा वाट पाहण्याची गरज नाही. आता फक्त कृतीची आवश्यकता आहे.’

दरम्यान, सोशल मीडियावरील एका वापरकर्त्याने लिहिले की, ‘पहलगाममध्ये जे घडले ते भयावह आहे. भारताने आता गप्प बसू नये. आपल्याला सर्जिकल स्ट्राईक 3.0 ची गरज आहे – आणि तेही लगेच.’

त्याच वेळी, इतर अनेक वापरकर्त्यांनी सरकारला आवाहन केले की, त्यांनी स्वतःला राजनैतिक भाषणांपुरते मर्यादित न ठेवता, वारंवार निष्पाप लोकांचे जीव घेणाऱ्या घटकांना लक्ष्य करावे.

दरम्यान, केंद्र सरकारने अद्याप कोणत्याही लष्करी प्रतिसादाची अधिकृतपणे पुष्टी केलेली नसली तरी, सूत्रांच्या माहितीनुसार, सुरक्षा संस्था प्रत्येक संभाव्य पर्यायाचा विचार करत आहेत. यापूर्वीही, 2016 आणि 2019 मध्ये उरी आणि पुलवामा हल्ल्यांनंतर, भारताने सर्जिकल स्ट्राईक (Surgical Strike) आणि हवाई हल्ल्यांद्वारे प्रत्युत्तर दिले होते. तथापी, भारत पुन्हा एकदा अशा वळणावर उभा आहे जिथे त्याला आपल्या नागरिकांचे संरक्षण करण्याचा आणि दहशतवादी घटकांविरुद्ध ठोस पावले उचलण्याचा निर्णय घ्यावा लागेल. त्यामुळे सरकार आता कोणत्या मार्गाने या भीतीदायक कृत्याला प्रतिउत्तर देते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.