टेंभू योजनेच्या ६ व्या टप्प्याचे २ ऑक्टोंबरला भूमिपूजन, सुहास बाबर

दिवंगत आ. अनिल बाबर हे टेंभू योजनेच्या पूर्ततेसाठी आपले आयुष्य जगले. खानापूर मतदारसंघातील एकही गाव टेंभूपासून वंचित राहू नये, यासाठी त्यांनी योगदान दिले. त्यांच्या आयुष्यातील शेवटची इच्छा ही टेंभू योजनेचा ६ वा टप्पा पूर्ण करून वंचित गावांना पाणी देण्याची होती. या टप्प्याला मंजुरी देऊन ती इच्छा मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह मंत्रीमंडळाने पूर्ण केली आहे.

खानापूर, आटपाडीसह विसापूर सर्कलमधील वंचित शेतीला पाणी देणासाठी विशेष मंजुरी मिळालेल्या टेंभू योजनेच्या ६ वा अ व ६ वा ब या दोन्ही टप्प्याचे भूमिपूजन दि. २ ऑक्टोंबर रोजी विटा येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते होणार असून या कार्यक्रमाला उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपस्थित राहणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

या ६ व्या टप्प्याचे भूमिपूजन दि. २ आॅक्टोंबर रोजी सकाळी ११ वाजता विटा येथील रेवानगर (सुळेवाडी) येथे मुख्यमंत्री शिंदे यांच्याहस्ते होणार आहे. यावेळी दोन्ही उपमुख्यमंत्री, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत. यावेळी विट्यात शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे सुहास बाबर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी तानाजीराव पाटील, जिल्हा बॅँकेचे संचालक अमोल बाबर, कृष्णत गायकवाड, उत्तम चोथे, अनिल म. बाबर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.