माढा विधानसभा मतदारसंघात नवा राजकीय ट्विस्ट समोर आला आहे.माढा मतदारसंघात उमेश परिचारक यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे आता अजित पवार गटाचे आमदार बबनदादा शिंदे यांचे राजकीय टेन्शन वाढले आहे.
परिचारक यांनी थेट विधानसभेच्या निवडणुकीत उडी घेतली, तर आमदार शिंदे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. माढा विधानसभा मतदारसंघात पंढरपूर तालुक्यातील 42 गावांचा समावेश आहे. या 42 गावांमध्ये परिचारक गटाची मोठी राजकीय ताकद आहे. शिवाय, याच मतदारसंघात माळशिरस तालुक्यातील 14 गावांचा समावेश आहे. यामध्ये त्यांच्या पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा ही समावेश आहे. त्यामुळे माढा मतदारसंघातून परिचारकांना निवडणूक लढवणे हे सोपे असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांचे मत आहे.
निवडणुकी संदर्भात अलीकडेच परिचारक गटाच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीत युटोपियन शुगरचे अध्यक्ष उमेश परिचारक यांनी माढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी मागणी केली आहे. या बैठकीनंतर सर्व पदाधिकाऱ्यांनी उमेश परिचारक यांची भेट घेऊन त्यांच्याकडे हा प्रस्ताव ठेवला आहे.
दोन दिवसांत या प्रस्तावावर निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन परिचारक यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना दिले आहे. त्यामुळे आता परिचारक गटाचे कार्यकर्ते माढ्याच्या तयारीला लागले आहेत. मंगळवारी या संदर्भामध्ये बाजार समितीचे माजी सभापती दिलीप आप्पा घाडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.
या बैठकीमध्ये माढा विधानसभा मतदारसंघातून उमेश परिचारक यांनी निवडणूक लढवावी, अशी मागणी त्यांच्याकडे केल्याचे त्यांनी सांगितले.