आमदार प्रकाश आवाडे यांचा भाजप प्रवेश! सुपुत्राला मिळणार विधानसभेचं तिकीट?उमेदवारीचा शब्द दिल्याची चर्चा

इचलकरंजी येथील आमदार प्रकाश आवाडे यांचा भाजप प्रवेश निश्‍चित झाला आहे. पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर आज त्यांच्या प्रवेशाला हिरवा कंदील मिळाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आज बुधवार दुपारी ३ वाजता कोल्हापुरातील महासैनिक दरबार हाॅलमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात आमदार आवाडे यांच्यासह त्यांचे पुत्र माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांचा प्रवेश होणार आहे.

काल रात्री उशिरा याबाबतच्या हालचालींना वेग आला. काँग्रेसचे निष्ठावंत घराणे म्हणून आवाडे यांची ओळख होती, मात्र गेल्या पाच वर्षांपूर्वी त्यांनी काँग्रेसला रामराम करीत गत विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी दाखल केली. त्यामध्ये भाजपचे विद्यमान आमदार सुरेश हाळवणकर यांचा त्यांनी पराभव केला.

त्यानंतर लगेचच त्यांनी विधानसभेत भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला.गेली पाच वर्षे ते भाजप प्रवेशासाठी उत्सुक होते. अनेकवेळा चर्चा होत राहिली, मात्र त्यांच्या प्रवेश सातत्याने लांबणीवर पडत गेला. अलीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांची जवळीक वाढली होती. त्यामुळे ते शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याचीही चर्ची होत राहिली.

आमदार आवाडे यांनी पुत्र राहुल यांची विधानसभेसाठी उमेदवारी यापूर्वीच जाहीर केली आहे. त्यादृष्टीने राहुल हे गतीने कामाला लागले आहेत, तर आगामी विधानसभा निवडणुकीत इचलकरंजी मतदारसंघातून राहुल आवाडे यांना भाजपकडून उमेदवारीचा पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून शब्द दिल्याची चर्चा आहे.