लोकसभेप्रमाणेच आता विधानसभा निवडणुकीत माढा विधानसभेवरून कुरघोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. भाजपचे विधान परिषदेचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी महाविकास आघाडीकडून विधानसभा लढवण्याचं जवळपास निश्चित केले आहे.त्यामुळे अजित पवारांसोबत असलेले माढाचे आमदार बबन शिंदेंनी शरद पवारांकडे धाव घेतली आहे.सोलापूरच्या विकासासाठी कोणतीही तडजोड करायला तयार आहे असे सांगत भाजपमधून राष्ट्रवादी पवार गटात येणार असल्याचे संकेतच रणजीतसिंह मोहिते पाटलांनी दिले आहेत. रणजितसिंह मोहिते पाटलांच्या या वक्तव्यामुळे सोलापूर जिल्ह्यात राजकीय चर्चेला तोंड फुटले आहे. त्यामागचे कारणही तसेच आहे.
रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपचे आमदार आहेत पण आता त्यांनी महाविकास आघाडीत प्रवेशाचे संकेत दिले आहेत. एवढेच नव्हे तर त्यांनी सोलापूर जिल्ह्यासाठी आपण कोणतीही तडजोड करायला तयार असल्याचे जाहीर करून टाकले आहे आणि त्यामुळेच ही चर्चा सुरु झाली आहे.माढा विधानसभा जिंकणे हे 2004 पासून मोहिते पाटील समर्थकांचे स्वप्न राहिलं आहे. आता रणजीतसिंह मोहिते पाटील माढ्यातून विधानसभा लढवण्यास इच्छुक असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. पण त्यामुळे माढा विधानसभेचे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांची कोंडी होणार आहे. खरंतर बबन शिंदे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत. पण असे असतानाही शिंदे यांनी शरद पवारांकडे धाव घेतली आहे.
तर इकडे भाजपचे नेते चांगलेच अस्वस्थ झाले आहेत.लोकसभेत रणजितसिंह मोहिते पाटलांनी धैर्यशील मोहिते पाटीलांचा उघडपणे प्रचार केला नाही. पण प्रचाराची सगळी सूत्र रणजीतसिंह यांच्या हाती होती. पण आता रणजीतसिंह मोहिते पाटलांनी आपली राजकीय दिशा स्पष्ट केली आहे. त्यामुळे भाजपाला मोहिते पाटील कुटुंबातील उरला सुरला पाठिंबाही गमवावा लागणार आहे.