टेंभू योजनेच्या ६ व्या टप्प्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंगळवारी भूमिपूजन झाले आहे. त्यामुळे खानापूर, आटपाडी आणि विसापूर मंडलातील उर्वरित वंचित ५४ गावांना टेंभूचे पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील दिवंगत आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या आठवणींना उजाळा दिला. टेंभू योजनेचे शिल्पकार असणारे अनिलभाऊ आज सर्वांच्या मध्ये उपस्थित नाहीत याचे सर्वांनाच दुःख होत असल्याचे त्यांनी व्यक्त केले.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, अनिलभाऊ शिवाय हा भूमिपूजनाचा कार्यक्रम होईल असे स्वप्नात देखील वाटले नव्हते.
ते शरीराने आपल्याबरोबर नसले तरी तुम्ही सर्वांनी दाखवलेला विश्वास तसेच या पूर्ण टेंभू योजना पूर्णत्वास नेण्यासाठी त्यांचा आत्मा सदैव आपल्यासोबत होता. अनिलभाऊ सदैव या मतदारसंघातील मतदारांसाठी झटले, जगले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनिल भाऊंसाठी गड आला पण सिंह गेला हे उद्गार काढले.