सर्वसामांन्य ग्राहकांना महागाईचा झटका ! डाळींच्या किमतीत मोठी वाढ

एकीकडे भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. तर दुसरीकडे आता डाळ देखील महागल्यानं गृहिणींंचं बजेट कोलमडलं आहे. डाळींच्या दरात प्रति किलो मागे वीस रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.कांदा, टोमॅटोचे दर वाढले असताना आता दर वाढीचा आणखी एक झटका सर्वसामान्य ग्राहकांना बसला आहे.नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात डाळीचे दर वाढले असून, किलो मागे दहा ते वीस रुपयांची वाढ झाली आहे.

डाळीचे दर वाढल्यामुळे ग्राहकांनी डाळीच्या खरेदीकडे पाठ फिरवल्याचं चित्र आहे. वाढीव डाळ नेण्याऐवजी ग्राहक कमी खरेदी करत आहेत. आवक नेहमी प्रमाणे आहे, मात्र दरात वाढ झाल्याने ग्राहक डाळ कमी प्रमाणात खरेदी करत आहेत, परिणामी डाळीच्या विक्रीमध्ये घट झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. या पुढील काळात डाळ आणखी महाग होऊ शकते अशी शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ होत असल्यानं सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशावर ताण पडला आहे.दरम्यान दुसरीकडे किरकोळ बाजारात कांदा आणि टोमॅटोच्या किंमतीनं पुन्हा एकदा उच्चांक गाठला आहे. किरकोळ बाजारात कांद्याचे दर प्रति किलो पन्नास ते साठ रुपये आहेत, तर टोमॅटोचे दर प्रति किलो चाळीस ते पन्नास इतके आहेत. इतर भाज्यांच्या दरामध्ये देखील मोठी वाढ झाली आहे.