किरकोळ महागाईनंतर आता घाऊक महागाईने जोरदार मुसंडी मारली आहे. आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहे. घाऊक महागाई दर गेल्या 8 महिन्यांच्या उच्चांकावर पोहचला आहे. घाऊक महागाईचे आकडे एप्रिल 2023 पासून उणे, कमी होते. पण या ऑक्टोबर महिन्यापासून महागाई दर 0.26 टक्क्यांवर पोहचला. नोव्हेंबर महिन्यात पण हा उच्चांक कायम होता. किरकोळ महागाई नोव्हेंबर महिन्यात गेल्या तीन महिन्यांच्या उच्चांकावर 5.55 टक्क्यांवर पोहचली. जुलै महिन्यात महागाईने मोठी झेप घेतली होती. त्यावेळी हा दर 7.44 टक्के इतका होता.
ग्राहक किंमत निर्देशांकाप्रमाणेच अन्नधान्याच्या निर्देशांकाने पण महागाईचा सूर आळवला. या दरात 1.9 टक्क्यांची वाढ झाली. घाऊक महागाईत महिन्याच्या आधारावर 0.5 टक्क्यांची वृद्धी झाली. महागाई वाढविण्यात काद्याचा सर्वात मोठा वाटा होता. काद्यांत 16.5 टक्क्यांची वाढ दिसून आली. फळांच्या किंमतीत 1.7 टक्के, गव्हाच्या किंमतीत 1.6 टक्के, डाळींचे भाव 1.4 टक्क्यांनी वधारले.
याच कालावधीत मॅन्युफॉक्चर्ड प्रोडक्टसच्या किंमतीत मोठी वाढ दिसली नाही. या इंडेक्समध्ये नाममात्र 0.1 टक्क्यांची वाढ झाली. महागाई काबूत ठेवण्यात या सेगमेंटने मोठी भूमिका निभावली. कच्चा मालाच्या किंमतीत घसरणीचा हा परिणाम असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. फार्मा आणि प्लाॉस्टिक उत्पादनाच्या किंमतीत 0.3-0.4 टक्क्यांची घसरण दिसली. गेल्या तीन महिन्यांपासून या सेगमेंटने ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे.
नोव्हेंबर महिन्यात उच्चांक गाठून पण या आर्थिक वर्षातील आठ महिन्यांचा घाऊक महागाईचा सरासरी आकडा तसा उणे, कमीच आहे. जुलै महिन्यात हा आकडा सर्वाधिक होता. पण लवकरच उपाय योजना केल्या नाहीत, तर पुढील महिन्यात हा आकडे सर्वसामान्यांचे बेहाल करतील, अशी भीती व्यक्त होत आहे. त्याचा परिणाम सकल राष्ट्रीय उत्पादनावर दिसून येईल. महागाईची वाढ जीडीपीसाठी धोकादायक असल्याचे अर्थतज्ज्ञांचे मत आहे. सध्या जीडीपीत चमत्कार घडला आहे. सरकारी कंपन्यांच्या जोरदार कामगिरीमुळे त्याने सर्वांचे अंदाज चुकवत मोठी कामगिरी केली आहे. पण भविष्यात महागाईला वेसण न घातल्यास जीडीपीवर त्याचा परिणाम दिसून येईल.