जयंत पाटलांच नाव घेत कोल्हेंचे संकेत! पुढची राजकीय भाकरी पवारांच्या राष्ट्रवादीतचं फिरणार…..

एकीकडे भाजपला रामराम करून हर्षवर्धन पाटील यांनी पवारांच्या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पवारांनी भाजपचा मोहरा फोडल्याने हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.त्यानंतर आता पुढचा राजकीय भूकंप शरद पवारांच्या पक्षात होईल असे संकेत खासदार अमोल कोल्हे यांनी दिले आहे. त्यांच्या या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

‘राष्ट्रवादी शरदचंद्र पवार’ पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेदरम्यान शिराळ्यात ते बोलत होते. आगामी काळात पार पडणाऱ्या निवडणुकांनंतर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार असल्याचा दावाही कोल्हे यांनी केला. सांगली जिल्ह्यातील मविआतील प्रत्येक उमेदवार हा आमदार झालाच पाहिजे, अशी भूमिका जर तुम्ही सर्वांनी घेतली तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षातील सर्वोच्च पद जे असेल ते जयंत पाटील यांच्याकडेच असेल असे कोल्हे यांनी ठासून सांगितले.

कोल्हे यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, जयंत पाटलांच्या गळ्यात अध्यक्षपादाची माळ पडणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.शरद पवारांची ओळख ही धूर्त राजकारणी अशी केली जाते. त्यांच्या मनात नेमकं काय सुरू आहे हे आतापर्यंत कुणालाही समजू शकलेले नसून, निवडणुकांच्या तोंडावर पवारांनी यापूर्वी भाकरी फिरवत विरोधकांना अनेक धक्के दिले आहेत. त्यामुळे आता पवार स्वतःच्या पक्षात भाकरी फिरवत जयंत पाटलांना पक्षाचं अध्यक्षपद देणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.