बुधवारी होणार पेठ येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण

पेठ ( ता. वाळवा) येथे ग्रामसचिवालयाच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे अनावरण बुधवार, दि. 9 रोजी खा. छत्रपती उदयनराजे भोसले, शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्याहस्ते होणार आहे.ही माहिती छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष सम्राट महाडीक यांनी दिली. यावेळी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष रोहित पाटील, सचिव राहुल पाटील, शेतकरी संघटनेचे धनपाल माळी, माजी सभापती जगन्नाथ माळी, माजी उपसरपंच शंकर पाटील, असिफ जकाते, विकास दाभोळे उपस्थित होते. सम्राट महाडीक म्हणाले, गेल्या सात वर्षापासून या पुतळ्याच्या उभारणीसाठी प्रयत्नशील होतो.

काही तांत्रिक कारणांमुळे या पुतळ्याचे ठिकाण बदलले. महायुती सरकारच्या काळात सर्व प्रशासकीय परवानग्या मिळाल्या. अखेर स्वप्न साकार होत आहे.ते म्हणाले, मिरज येथील शिल्पकार गजानन सलगर यांनी हा पुतळा बनवला आहे. यानिमित्ताने मंगळवारी (दि. 8) सायंकाळी पारंपरिक वाद्यांसह शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. बुधवारी सकाळी महादेव शिवाचार्य वाईकर महाराज, राजपुरोहित प्रकाश शास्त्री यांच्या प्रमुख उपस्थितीत महेश स्वामी, उमेश स्वामी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा व अभिषेक असे धार्मिक विधी होणार आहेत. सायंकाळी पुतळ्याचे अनावरण होणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलिसप्रमुख संदीप घुगे यावेळी उपस्थित राहणार आहेत. शिवप्रेमींसाठी शाहीर देवानंद माळी यांच्या पोवाड्यांचा कार्यक्रम होणार आहे.