मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत मंगळवारी सोलापुरातील होम मैदानावर वचनपूर्ती सोहळा पार पडणार आहे. मुख्यमंत्री विमानाने येणार असून त्यांचा ताफा विमानतळावरून थेट होम मैदानावर दाखल होणार आहे. त्यासाठी मंगळवारी (ता. ८) सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत विमानतळ ते होम मैदान हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार आहे. त्यासाठी या रस्त्यावर पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. विमानतळावर मुख्यमंत्र्यांचे आगमन होण्यापूर्वी विमानतळ, आसरा चौक, महिला हॉस्पिटल, महावीर चौक, आरडीसी कॉर्नर, व्होडाफोन गॅलरी, रंगभवन ते होम मैदान हा सहा किलोमीटर रस्ता वाहतुकीसाठी बंद असणार आहे.
पण, सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत हा संपूर्ण रस्ता बंद ठेवल्यावर या मार्गावरील वाहनांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा ताफा विमानतळावरून निघण्यापूर्वी ३० मिनिटे अगोदर आणि कार्यक्रम संपण्याच्या ३० मिनिटांपूर्वी हा रस्ता पूर्णत: वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचे नियोजन शहर पोलिसांचे आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमासाठी मंगळवारी शहर पोलिसांचा जवळपास दीड हजाराचा बंदोबस्त नेमला जाणार आहे. त्यात वाहतूक पोलिसांचे २०० कर्मचारी वाहतूक नियमनासाठी नेमले आहेत. कार्यक्रमाच्या ठिकाणी, बंद केलेल्या रस्त्यावर, बसमधून महिला लाभार्थी ज्याठिकाणी उतरतील, तेथे देखील हा बंदोबस्त नेमला जाणार आहे.