मंगळवेढा शहरातील साठेनगरसह अन्य भागात अवैध दारूधंदे बोकाळले असून दारूमुळे तरुण मुले व्यसनाधीन होऊन मृत्युमुखी पडत आहेत. दरम्यान, या दारूमुळे तरुण वयातील मुली विधवा बनून त्यांना आयुष्यभर संकटांना मुला बाळासह सामोरे जावे लागत असल्याची तक्रार माजी मंत्री तथा भाजपचे प्रदेश प्रवक्ते प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी एका लेखी निवेदनाद्वारे पोलिस प्रशासनाकडे करून शहरासह ग्रामीण भागात अवैध धंद्याने मांडलेला उच्छाद तत्काळ थांबवावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मंगळवेढा शहरातील साठेनगर भागात जवळपास सहा अवैध धंदे तर शहराच्या अन्य भागांतही बिनबोभाट दारू धंदे सुरू आहेत. त्याचबरोबर तालुक्याच्या ग्रामीण भागातही अशीच परिस्थिती असून दारूमुळे तरुण मुले व्यसनाच्या आहारी जाऊन मृत पावत आहेत. शहरामध्ये आतापर्यंत जवळपास 10 तरुण मृत पावल्याचे चक्क नावासह यादीच पोलीस प्रशासनास माजी मंत्री ढोबळे यांनी सादर केली आहे.
पोलीसांच्या हप्तेखोरीमुळे तरुण मुलांची जीव जावून गोरगरीबांचा संसार रस्त्यावर येत असल्याचे विदारक चित्र आहे. एका माजी मंत्र्याला दारुसाठी चक्क पोलीस स्टेशनला दारु बंद करा म्हणण्याची वेळ आल्याने सुज्ञ नागरीकांनी कपाळा हात लावले आहेत. दरम्यान पोलिस उपनिरीक्षक पुरुषोत्तम धापटे यांना माजी मंत्री प्रा. ढोबळे यांनी दारू व्यवसाय बंद करण्याचे निवेदन दिल्याने पोलिस प्रशासन आता तरी दारू व्यवसाय बंद करणार याकडे तमाम नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.