कोल्हापूरच्या जनावर बाजारात ३ कोटींची उलाढाल! बावचीच्या खिलार बैलजोडीने वेधले सगळ्यांचेच लक्ष

कोल्हापूर येथील वडगाव बाजार समितीत विजयादशमीच्या पहिल्या सोमवारी जनावरांचा अंबाबाई लक्ष्मी बाजार महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यात प्रसिद्ध आहे. सोमवारी बाजारात तब्बल तीन कोटींची उलाढाल झाली.महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातील शेतकरी, व्यापारी मोठ्या संख्येने बाजारात खरेदीसाठी आले होते. या बाजारात नायकू महादेव भोसले (रा. बावची) यांची नऊ लाख किमतीची खिलार जातीची बैलजोडीने शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.

कोल्हापूर जिल्ह्यातील वडगावचा बाजार महाराष्ट्र, कर्नाटक आदींसह शेजारील राज्यामध्ये प्रसिद्ध आहे. उत्तम जातीची बैल जोडी, म्हशी यांची खरेदी-विक्री येथे मोठ्या प्रमाणात होते. म्हशींच्या बाजारात मुरा, म्हैसाणा, पंढरपुरी, दुग्गल, गावठी, जाफराबादी, दुग्धी, मेंढा अशा विविध जातींच्या म्हशी विक्रीसाठी आल्या होत्या. म्हशीच्या किमती चाळीस हजार ते दोन लाखांपर्यंत होत्या.

गायीच्या जातीमध्ये एच एफ, होस्टन, जर्सी, रेड डेनिथ, गीर विक्रीस आल्या होत्या. त्यांच्या किमती ४० हजारांपासून दोन लाखांपर्यंत होत्या. गायीची आवक मोठी होती. खरेदी-विक्रीचे व्यवहार सर्वाधिक गाय, म्हशींचे झाले.