हातकणंगले तालुक्यातील लक्ष्मीवाडी येथील राजाराम प्रभू खोत यांनी हातकणंगले पोलिस निरीक्षक व कॉन्स्टेबल यांनी जमीन खरेदी दस्त, आधार कार्ड, फोटो जबरदस्तीने मारहाण करून काढून घेतल्याची तक्रार कोल्हापूर पोलिस अधीक्षकांकडे केली आहे .तक्रारीनुसार राजाराम प्रभू खोत यांनी लक्ष्मीवाडी येथील गट नंबर १५१/१ ची जमीन २०१२ ला एका शैक्षणिक संस्थेला दिली होती.
बारा वर्षांत खरेदी व्यवहार पूर्ण न झाल्याने त्यांनी सदरची जमीन आप्पासो नाना हांडे, सुशीला विठ्ठल हांडे, कुबेर विठ्ठल हांडे, भाऊसो विठ्ठल हांडे, शोभा मनीष हंदीकोळी यांच्याकडून १४ ऑगस्ट २०२३ रोजी जमीन खरेदी केली आहे. याबाबत हातकणंगले पोलिसांनी राजाराम खोत यांना पोलिस ठाण्यामध्ये बोलवून घेऊन दमदाटी करत शिवीगाळ केली व मूळ दस्त मागवला.
हा दस्त घरी असल्याचे कळल्यानंतर राजाराम खोत यांना पोलिस गाडीमधून घरी जाऊन कॉन्स्टेबल कुलदीप मोहिते यांनी मूळ दस्त काढून घेत धमकावून काढून घेतला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच पोलिस निरीक्षक शरद मेमाने यांनी शिवीगाळ करत अटक करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.