महायुती सरकारकडून शिरटेच्या श्री सीतादेवी मंदिरास चार कोटींचा भरीव निधी!

वाळवा तालुक्यातील शिरटे येथील सीतादेवी मंदिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महायुती शासनातर्फे श्री सीतादेवी मंदिरास ब वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा देऊन तीन कोटी 99 लाख इतका भरीव निधी दिल्याची माहिती सांगली जिल्हा प्रमुख आनंदराव पवार यांनी दिलेली आहे. वाळवा तालुक्यातील शिरटे येथे श्री सीतादेवी मंदिरासाठी बऱ्याच वर्षापासून विकासासाठी मागणी होती ब वर्गात समावेश करण्यासाठी प्रस्ताव धूळ खात पडलेला होता. ज्यावेळी हे निदर्शनास आले त्यावेळी शिरटे गावचे ग्रामपंचायत सदस्य दिग्विजय जगताप, वैद्यकीय मदत पक्षाचे संपर्कप्रमुख अमोल पाटील, तालुकाप्रमुख सागर मलगुंडे यांनी ही बाब शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांच्या निदर्शनास आणून दिली.

यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या मंदिराची माहिती व इतिहासाचे अवलोकन पवार यांनी करून दिले. यावर मुख्यमंत्र्यांनी प्रस्तावाची मागणी केली. जिल्हा परिषदेकडे अनेक वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या प्रस्तावाची परिपूर्णता करून ग्रामविकास मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवला होता.