कोल्हापूरचा लोकप्रिय रीलस्टार धनंजय पोवारने यंदा ‘बिग बॉस’चं पर्व प्रचंड गाजवलं. अचूक ग्रुपची निवड, गेमप्लॅन, सतत कॉमेडी, थट्टा-मस्करी करून संपूर्ण घराला हसत खेळत ठेवायचं या स्वभावाने महाराष्ट्राच्या तमाम प्रेक्षकांचं मन डीपीने जिंकून घेतलं.याशिवाय या घरात त्याला अंकिताच्या रुपात मानलेली बहीण भेटली. त्यामुळे सूरज असो किंवा अंकिता या सगळ्यांसाठी धनंजय घरचा ‘डीपी दादा’ झाला. प्रेक्षकांना सुद्धा धनंजयचं प्रत्येक सदस्याशी असलेलं बॉण्डिंग प्रचंड आवडलं. यामुळेच धनंजयला टॉप-४ च्या शर्यतीपर्यंत मजल मारता आली.
खरंतर डीपीने घरात एन्ट्री केल्यावर तो इथवर पोहोचेल असं कोणालाच वाटलं नव्हतं मात्र, आपल्या खेळाने धनंजयने सर्वांचं मन जिंकून घेतलं. या ‘बिग बॉस’च्या घरात डीपीसाठी आणखी एक सकारात्मक गोष्ट घडली ती म्हणजे त्याचे बाबा खास इचलकरंजीहून त्याचं कौतुक करण्यासाठी मुंबईत आले होते.धनंजय पोवार मूळचा कोल्हापूरचा आहे. सोशल मीडिया रील स्टार म्हणून ओळख असलेल्या डीपीचा इचलकरंजीत मोठा व्यवसाय आहे. करोना काळात पोवार कुटुंबीयांचे घरगुती व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय झाले होते. याशिवाय डीपी म्हणजेच धनंजय पोवारचं इचलकरंजीत ‘सोसायटी फर्निचर’ हे तीन मजली भव्य असं शोरुम आहे.
‘बिग बॉस’च्या आधी त्याने एक व्यावसायिक म्हणूनही मोठी लोकप्रियता आणि यश मिळवलं आहे. याच दुकानाबाहेर त्याच्या स्वागतासाठी भव्य तयारी करण्यात आली.’सोसायटी फर्निचर’ या त्याच्या दुकानाबाहेर खास ‘कोल्हापुरी हलगी’ आणि संभळ वाजवून डीपीचं स्वागत करण्यात आले.कोल्हापुरला पोहोचल्यावर सर्वप्रथम डीपीने जोतिबाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर इचलकरंजी येते त्याचं आगमन झाल्यावर त्याच्या चाहत्यांनी भव्य रॅली काढली. डीपीने यावेळी सगळ्या चाहत्यांचे आभार मानले, सर्वांना अभिवादन करून फोटो काढले. याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.