इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ जयंत पाटील यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ हा हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. २००८ मध्ये विधानसभा मतदारसंघांची फेरमांडणी झाल्यानंतर इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. त्याआधी हा मतदारसंघ वाळवा विधानसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जात होता.राष्ट्रवादी काँग्रेस(शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते जयंत राजाराम पाटील हे इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.
आधी वाळवा विधानसभा मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात मागील तीन दशकांपासून जयंत पाटील यांचे वर्चस्व आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचा इस्लामपूरचा गड काबीज करण्यासाठी भाजपने मोर्चेबंधणी सुरू केली आहे. मात्र गेली तीन दशके या मतदारसंघावर वर्चस्व राखणाऱ्या पाटील यांना नमवण्यासाठी पाटील विरोधकांची मोट बांधण्याचे मोठे आव्हान महायुतीसमोर आहे. वाळव्यासह शिराळा मतदारसंघात जयंत पाटील यांचे राजकीय वर्चस्व कायम राहिले आहे.
या ताकदीवरच त्यांनी सांगली जिल्ह्याचे नेतृत्व मिळविण्याचा कायम प्रयत्न केला. सांगली महापालिकेतही सत्ताबदल घडवून आपली राजकीय ताकद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. घरच्या मैदानात आपल्या विश्वासू शिलेदारांवर जबाबदारी सोपवून ते राज्य पातळीवर पक्षाची प्रदेशाध्यक्षांच्या भूमिकेतून बांधणी करत आहेत. आगामी निवडणुकीसाठी आमदार म्हणून माजी नगराध्यक्ष निशीकांत पाटील यांनाच लोकांची पसंती असल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर सभेत बोलताना सांगितले. त्यामुळे महायुतीकडून सांगली जिल्हा भाजपाचे अध्यक्ष निशीकांत भोसले पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.