इचलकरंजी, या औद्योगिक नगरीमध्ये अनेक बेरोजगार कामगार काम शोधण्यासाठी व कामासाठी येत आहेत मात्र या कामगारांचे कोणतेही रेकॉर्ड मालक ठेवत नाहीत. यामुळे या शहराला गुंडगिरी व इतर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कामगारांचे रेकॉर्ड ठेवण्याचे आदेश येथील मालकांना करावेत याकरिता कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईटे यांना निवेदन देण्यात आले.
इचलकरंजी शहर परिसरात परप्रांतीय कामगारांची संख्या ही प्रचंड वाढलेली आहे. हे कार्यालय प्रत्यक्ष कारखान्याला भेटी देऊन पडताळणी करत नाही. कामगार किती आहेत, त्यांना किमान वेतन मिळते का, कीती तासांची ड्युटी आहे, याचबरोबर त्या कामगारांची कागदपत्रे व्यवस्थित आहेत का. याची पडताळणी सहाय्यक कामगार आयुक्त यांच्यावतीने झालेले दिसून येत नाही. कोणतेही रेकॉर्ड नसते. त्यांचे गुंडगिरी स्वरूप असेल तर लक्षात येत नाही, यामुळे शहरात खुनाचे प्रमाण वाढले आहे, त्याचाच परिणाम म्हणून कामगाराला कामावरून जरी कमी केले तरी कामाचा मोबदला त्या कामगारांना मिळत नाही. किंबहुना या कामगारांच्या तक्रारींना कोणताही आधार राहत नाही त्यामुळे सहायक कामगारांच्या किमान वेतन, हजेरी कार्ड, बँकेत त्यांच्या खात्यावर पगार यासह इतर कागदपत्रे प्रत्यक्ष कारखान्यात जाऊन पडताळणी करावी, अशी मागणी कामगार संघटना समिती वतीने करण्यात आली. सदर प्रकरणी वरिष्ठांशी चर्चा करून त्याबद्दलची कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन सहाय्यक कामगार आयुक्त यांनी दिले. यावेळी शिष्टमंडळात दत्ता माने, शामराव कुलकर्णी, आनंदा गुरव, राजेंद्र निकम, सुनील बारवाडे, हनुमंत लोहार, रुपेश कांबळे आदी उपस्थित होते.
