सध्या इचलकरंजी महानगरपालिकेने शास्तीसह घरफाळा मागणीची बिले लागू केली आहेत. इचलकरंजी औद्योगिक शहर असून शहरांमध्ये कामगार वस्ती मोठ्या प्रमाणात आहे. कामगारांनी छोट्या जागा घेऊन घरे बांधलेली असून त्यांना बांधकाम परवाना मिळत नसल्याने अशा घरांना शास्ती लागू झाली आहे. तसेच निवासी व व्यवसाय अशा एकत्रित स्वरूपाच्या मिळकतींनाही शास्ती लागली आहे.
मालमत्ता धारकांना लागू केलेली शास्ती रद्द करण्यासाठी शासन दरबारी मी प्रयत्न करत असून येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत त्याबाबत सकारात्मक निर्णय होईल अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांनी दिलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसे निर्देश दिले आहे. त्यामुळे शहरातील मालमत्ता धारकांना मोठा दिलासा मिळेल असा विश्वास माने यांनी यावेळी व्यक्त केला आहे.