आगामी विधानसभा निवडणूक सदाभाऊ की वैभवदादा लढविणार प्रश्न निकाली….

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी खानापूर मतदारसंघातून महायुतीची उमेदवारी सुहास भैया बाबर यांना फायनल होईल अशीच परिस्थिती आहे. केवळ यांच्या नावाची औपचारिक घोषणा करणे बाकी आहे. अशातच महायुतीचा घटक पक्ष असणाऱ्या गटाचे नेते ॲड. वैभवदादा पाटील हे महायुतीमधून बाहेर पडतील यात देखील कोणती शंका वाटत नाही आणि याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून उमेदवारीसाठी पाटील गटाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार माजी आमदार सदाशिवभाऊ पाटील, राजेंद्रअण्णा देशमुख आणि वैभव दादा पाटील यांनी पुणे येथे जाऊन राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सुरू असणाऱ्या उमेदवारी संदर्भातील मुलाखती दिल्या.

यावेळी राजेंद्रअण्णा आणि सदाशिवभाऊ एक संघपणे एकत्र असल्याचे यावेळी पाहायला मिळाले. अशातच उमेदवारी पाटील गटाकडे राहिल्यास सदाभाऊ लढणार की वैभव दादा? असा प्रश्न होता. परंतु हा प्रश्न आता जवळजवळ निकाली लागल्याचे पाहायला मिळत आहे. वैभव दादा आगामी निवडणूक लढतील असे चित्र दिसून येत आहे.

महाविकास आघाडीकडून तिकीट वाटप झाले नसले तरीही आगामी निवडणूक माजी आमदार सदाशिवभाऊ पाटील लढणार की वैभव दादा लढणार याबाबत देखील मतदारसंघात जोरदार चर्चा सुरू आहे.अनुभवी आणि दूरदृष्टी असणाऱ्या सदाशिव भाऊंनी ही शेवटची निवडणूक म्हणून लढवावी अशी देखील मागणी एका मोठ्या वर्गातून होत आहे. तर वैभव दादा पाटील यांनी या निवडणुकीसाठी चांगली तयारी केली आहे त्यामुळे त्यांनीच ही निवडणूक लढवावी अशी देखील मागणी कार्यकर्त्यांकडून होत आहे.

परंतु आगामी निवडणूक ॲड. वैभव पाटील यांनीच लढवावी अशी चर्चा पाटील कुटुंबीयांच्या घरगुती पातळीवर झाली असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी वैभवदादा पाटील टक्कर देण्यासाठी ताकदीने समोर येतील अशी शक्यता परिस्थितीवरून दिसून येत आहे.